Sunday, September 23, 2018

गिरगाव चौपाटी येथील गणेश विसर्जन सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती


मुंबई, दि. 23 : गणेशभक्तांच्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात तसेच देशविदेशातील पर्यटकांच्या उपस्थितीत आज मुंबईतील गणेश विसर्जन सोहळ्यात श्री गणेशाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सोहळ्यात उपस्थिती लावून गणेशाला मनोभावे निरोप दिला.

यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, आमदार राज पुरोहित, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, अमृता फडणवीस, बृहन्मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त अजोय मेहता उपस्थित होते.


दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाने झाली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गिरगाव चौपाटीवर मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या तसेच घरगुती गणेश मुर्तींचे विसर्जन झाले.


गिरगाव चौपाटी येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने विदेश पर्यटकांसाठी गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी उभारण्यात आलेल्या उंच व्यासपिठास मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी भेट दिली. तसेच विदेशी पर्यटकांशी संवाद साधला तसेच गणेशोत्सव तसेच विसर्जन सोहळ्याविषयी आलेला अनुभव जाणून घेतला. पर्यटकांनीही हा सोहळा भक्तीचा मेळा असल्याची भावना व्यक्त केली.

विदर्भाच्या विकासासाठी धडपडणारा नेता हरपला - मुख्यमंत्र्यांची माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांना श्रद्धांजली


मुंबई, दि. २३ : माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री  शांताराम पोटदुखे यांच्या निधनाने विदर्भाच्या सर्वांगीण  विकासासाठी झटणारा एक महत्त्वाचा नेता आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.


मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्री.पोटदुखे यांनी  सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ व सरदार पटेल मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात अभियांत्रिकी, विज्ञान, कला, वाणिज्य, समाजकार्य, विधी महाविद्यालयांचे एक  मोठे शैक्षणिक जाळे विणले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन वेळा यशस्वी करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. त्यासोबतच विदर्भातील विविध साहित्यविषयक  उपक्रमात त्यांचा सातत्याने पुढाकार होता. सक्रिय राजकारणापासून दूर झाल्यानंतरही ते समाजकारण, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात अखेरपर्यंत सक्रिय होते. त्यांच्या निधनाने विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्नशील असणारा एक प्रमुख नेता आपण गमावला आहे.

नैसर्गिक, पारंपारिक आणि प्रदुषणमुक्त पद्धतीने सण साजरे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन


मुंबई, दि.23 : दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी कृत्रिम पद्धतीने तयार करण्यात आलेल्या  पाण्याच्या टाकीमध्ये  श्री  गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन केले. नैसर्गिक, पारंपरिक पद्धतीने आणि प्रदुषणमुक्त सण साजरे करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.श्री.फडणवीस म्हणाले, गणेशोत्सवात सामाजिक अभिसरण होत असते. या उत्सवात समाजातील भेदभाव  टाळून संघटीत शक्ती आपण ईश्वरास अर्पित करीत असतो. उत्सवांची रचना ही निसर्गाशी साधर्म्य साधणारी असल्याने उत्सवात निसर्गाचे संवर्धन करणे महत्वाचे आहे. पारंपारिक वाद्यांमध्ये अनोखा उत्साह असल्याने प्रदूषण टाळण्यासाठी पारंपारिक वाद्यांचा वापर करावयास हवा, असेही श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

‘आयुष्मान भारत’ योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांचे निर्देशधुळे, दि. 23 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीआयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनादेशाला समर्पित केली आहे. या योजनेचा देशभरातील सुमारे 50 कोटी नागरिकांना लाभ होणार आहे. धुळे जिल्ह्यात या योजनेची आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लोकार्पणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे उपस्थित होते. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात या योजनेच्या पाच लाभार्थ्यांना गोल्डन कार्डचे वितरण करण्यात आले.


केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.भामरे म्हणाले, ‘आयुष्मान भारतयोजना जगात एकमेव आहे. अशा प्रकारची योजना कुठेही लागू नव्हती. देशातील गरिबांच्या सर्वांगीण कल्याणासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवीत आहे. त्यापैकीच आयुष्मान भारतही एक योजना आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहिलेल्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करीत या योजनेचा लाभ तळागाळातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा. या योजनेंतर्गत समाविष्ट होणाऱ्या रुग्णाला सर्व प्रकारचा लाभ देण्यात यावा. त्यांच्या आरोग्याविषयी आरोग्य यंत्रणा, या योजनेत समाविष्ट रुग्णालयांनी पाठपुरावा करावा.

देशातील गरिबांच्या आरोग्याची काळजी घेणारीआयुष्मान भारतही योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ होऊन देशाचे सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे. ‘आयुष्मान भारतयोजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करीत राष्ट्रकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.भामरे यांनी यावेळी केले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गंगाथरण म्हणाले, आरोग्य सेवेपासून वंचित राहणाऱ्या नागरिकांना या योजनेचा मोठा लाभ होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून रुग्णांना लाभ होण्याबरोबरच रुग्णालयांचे अद्ययावतीकरण होण्यास मदत होईल. आरोग्याच्या मूलभूत सोयीसुविधा नागरिकांना मिळतील, असेही त्यांनी नमूद केले. या योजनेत प्रति कुटुंबावर प्रति वर्ष पाच लाखांच्या रकमेचे मोफत उपचार होतील. योजना पूर्णपणे नि:शुल्क असून सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या कर्करोगाचे उपचार, मानसिक आजारांचा समावेश आहे. धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 1 लाख 68 हजार 101, तर शहरी भागातील 36 हजार 103 लाभार्थ्यांना लाभ होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सांगळे यांनी आभार मानले. यावेळी  तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचविण्याचे केंद्रीय राज्‍यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन
पुणे, दि. २३ : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ गरीब जनतेपर्यंत पोहोचवण्‍यासाठी सर्वांनी प्रयत्‍न करावेत, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्‍याय राज्‍यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

जिल्‍हाधिकारी कार्यालयात केंद्रीय राज्‍यमंत्री श्री.आठवले आणि जिल्‍ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्‍या हस्‍ते निवडक लाभार्थ्यांना ई-कार्ड चे वाटप करण्‍यात आले. त्‍यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास खासदार अनिल शिरोळे, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, पुण्‍याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, आरोग्‍य उपसंचालक डॉ.नितीन बिलोलीकर, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ.अशोक नांदापूरकर, जिल्‍हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप माने,  निवासी उपजिल्‍हाधिकारी  जयश्री कटारे, डॉ.अमोल म्‍हस्‍के आदी उपस्थित होते.केंद्रीय राज्‍यमंत्री श्री.आठवले म्‍हणाले, औषधांऐवजी, पैशांअभावी एखाद्याचा मृत्‍यू होऊ नये, यासाठी ही योजना महत्त्वाची आहे. या योजनेमुळे राज्यातील 83 लाख 72 हजार कुटुंबांना मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे. आयुष्मान भारत योजनेसोबतच राज्य शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना एकत्रितपणे राबविण्यात येणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. गरीबांच्‍या भल्यासाठी ही योजना असून आपण सर्वांनी गरीबांना या योजनेचा फायदा मिळवून द्यायचा आहे, असे आवाहन त्‍यांनी केले.

पालकमंत्री गिरीश बापट यांनी गरीब आणि सामान्‍य माणूस केंद्रबिंदू मानून शासनाच्‍या योजना असल्‍याचे सांगून गरीबांपर्यंत या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन केले. आपल्‍या यशामागे एक कार्यकर्ता- दहा लाभार्थी हे सूत्र असल्‍याचे नमूद करुन शासनाच्‍या विविध योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवत असल्याचे त्‍यांनी सांगितले. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना यशस्‍वी करण्‍यासाठी सर्व संबंधितांनी एकदिलाने काम करावे, हे एक मिशन आहे, असे समजून काम करावे, असे आवाहन त्‍यांनी केले. गरीब माणसांची सेवा केली तर त्‍यासारखा आनंद व सुख कशातही नाही, असेही ते म्‍हणाले.

जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी प्रास्‍ताविक केले. ते म्‍हणाले, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही सर्वसामान्‍य जनतेसाठी जगातील सर्वात मोठी आरोग्‍य योजना आहे. हा एक फ्लॅगशिप कार्यक्रम होणार असून गरीब माणसांसाठी आशा निर्माण करणारी योजना आहे. 2011 मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेतील आकडेवारीनुसार 83 लाख 72 हजार लाख कुटुंबांची निवड आयुष्मान योजनेंतर्गत करण्यात आली असून त्यांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत. पुणे जिल्‍ह्यात 4 लक्ष 57 हजार 28 कुटुंबांना त्‍याचा लाभ मिळेल. त्‍यामध्‍ये शहरातील 2 लाख 77 हजार 633 तर ग्रामीण भागातील 1 लाख 79 हजार 395 कुटुंबांचा समावेश आहे. या योजनेत शासकीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये सहभागी होणार आहेत. त्यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना उपचाराची सुविधा देणार आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांनादेखील सहभागी करुन घेतले जाणार आहे. या योजनेच्‍या लाभा‍र्थी डाटा एंट्रीचे राज्‍यात सर्वात चांगले काम पुणे जिल्‍ह्यात झाले असल्याचे जिल्‍हाधिकारी राम यांनी आवर्जुन सांगितले.

जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. नांदापूरकर यांनी सध्या पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविली जात असून या योजनेच्या माध्यमातून 971 प्रकारचे उपचार, 121 शस्त्रक्रिया पश्चात सेवा देण्यात येत असल्‍याचे सांगितले.  प्रतिवर्ष दीड लाख रुपयांपर्यंत उपचारांची सुविधा योजनेतून दिली जात आहे. राज्यात आयुष्मान भारत योजनेसोबतच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना एकत्रितरित्या राबविली जाणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.


प्रारंभी धन्‍वंतरीचे पूजन प्रमुख पाहुण्‍यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. आभार प्रदर्शन जिल्‍हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप माने यांनी केले.

'दिलखुलास' कार्यक्रमात उद्या सांस्कृतिक कार्य संचालक संजीव पलांडे यांची मुलाखतमुंबई, दि. २३ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक संजीव पलांडे यांची मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सोमवार दि. २४ आणि मंगळवार दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत विभागीय संपर्क अधिकारी वर्षा फडके-आंधळे यांनी  घेतली आहे.   


शासनाने ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके, गीतकार ग. दि. माडगूळकर आणि साहित्यकार पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांची रुपरेषा, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या स्थापनेमागचा उद्देश व कार्यपद्धती, कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने राबविण्यात येणारे उपक्रम, बालनाट्य, कीर्तन व शाहिरी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन, वयोवृद्ध, अपंग कलाकारांना मदत, कलाकारांना देण्यात येणारे विविध पुरस्कार, सवलती व शिष्यवृत्ती, तसेच पु.ल.देशपांडे कला अकादमीबाबत माहिती श्री.पलांडे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.

'आयुष्मान भारत'च्या माध्यमातून गरीबांच्या सेवेची संधीच; शेवटच्या घटकांपर्यत योजना पोहोचविण्याचे - केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

प्रधानमंत्री आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे लोकार्पण 


नागपूर, दि. २३ : आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही समाजातील वंचीत, गरीब कुटुंबांतील नागरिकांच्या  सेवेची संधी आहे. या योजनेला गरीब, आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकप्रतिनीधी, शासकीय यंत्रणा, अशासकीय संस्था यासह सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.

प्रधानमंत्री आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे लोकार्पण आज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत  बचत भवन सभागृहात करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, महापौर श्रीमती नंदाताई जिचकार, खासदार डॉ.विकास महात्मे, कृपाल तुमाने, तसेच सर्वश्री आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, मल्लीकार्जुन रेड्डी, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे उपस्थित होते.आयुष्मान भारत ही योजना जगातील सर्वात मोठी आरोग्य सुरक्षा योजना असल्याचे सांगून श्री.गडकरी  म्हणाले की, गरीबांना उत्तम आरोग्य देण्याचा या योजनेचा हेतू आहे. वैद्यकीय उपचार हे बरेचदा सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असतात. सामान्यांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी ही योजना आहे. या योजनेमध्ये कर्करोग, मानसीक रोग यावर देखील या योजनेत उपचार करण्यात येतील. जिल्ह्यातील 3.77 लक्ष लाभार्थ्याना या योजनेचा लाभ होणार आहे. त्यापैकी  ग्रामीण भागात 1 लाख 76 हजार तर शहरी भागात 2 लाख 398 लाभार्थी आहेत. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय व डागा स्मृती महाविद्यालयाचा या योजनेमध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.

पूर्णपणे निशुल्क असणारी ही योजना आरोग्यसेवेतील महत्वाचा टप्पा आहे. राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजना सोबतच ही योजना राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी नितीन दौडकर, वर्षा ठोंबर, देवीदास मेश्राम, अनिल साठे, गजानन सोनटक्के, किशोर दुधबर्वे, रामू तेंलग, दिपक बर्वे, नारायण मुडडमवार या निवडक लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात या योजनेच्या ई-कार्डाचे वाटप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. झारखंड राज्यातील रांची येथे प्रधानमंत्री यांच्या हस्ते झालेल्या देशपातळीवरील कार्यक्रमाचे प्रक्षेपण  यासेळी सभागृहात दाखविण्यात आले.

जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, अतिरीक्त महानगरपालिका आयुक्त रविंद्र ठाकरे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, आरोग्य उपसंचालक डॉ.संजीव जयस्वाल यांचीदेखील यावेळी उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.पातुरकर, संचालन रेणुका देशकर तर आभार जिल्हा आरोग्य अधिकारी  योगेंद्र सवाई यांनी मानले.

योजनेची वैशिष्ट्ये
ही योजना पूर्णपणे नि:शुल्क आहे. सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा समावेश (गुडघा, खुबा, कोपर, प्रत्यारोपण), लहान मुलांच्या कर्करोगाचा उपचारांचा समावेश, मानसिक आजरावरील उपचारांचा समावेश, प्रति कुटुंब प्रति वर्ष 5  लाखाच्या रकमेचे मोफत उपचार, इतर राज्यातील लाभार्थी कुटुंबे योजनेचा लाभ घेऊ शकतात, कुटुंबाचा समावेश लाभार्थ्यांच्या यादीत होत असल्यास संगणक प्रणालीद्वारे कुटुंब सदस्यास ई-कार्ड मिळण्याची तरतूद, केंद्रचा 60 टक्के हिस्सा तर राज्याचा 40 टक्के हिस्सा, 1000 पेक्षा जास्त उपचारांचा लाभ, प्रधानमंत्री जन आरोगय योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांची एकत्रितपणे अंमलबजावणी, योजना पूर्णपणे संगणीकृत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरवातीला 79 शासकीय रूग्णालयात लाभार्थ्यांना उपचार देणार, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या 489 अंगीकृत रूग्णालयामार्फत पूर्वीप्रमाणे 971 उपचारांची सेवा मिळणार, अंगीकृत रूग्णालयात आयुष्मान मित्रांची नेमणूक.


आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते शुभारंभ

हेल्थ कार्डचे वाटप; ३.५ लाख कुटुंबाना फायदा

ठाणे, दि. 23 : प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तथा आयुष्मान भारत या योजनेचा शुभारंभ आज ठाणे येथे  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात १० कुटुंबांना हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार कपिल पाटील, खासदार राजन विचारे, आमदार किसन कथोरे, आमदार रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, आरोग्य उपसंचालक डॉ गौरी राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री.रेंगे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील आदींची उपस्थिती होती.

यावेळी अलका धोंगडे, शंकर घोडे, जयेश गोडे, सुमन इतरकर, रुपाली धोंगडे, मानसी भगत, चंद्रकांत साबळे, लक्ष्मीशंकर घोडे, सखुबाई यांना मान्यवरांच्या हस्ते हेल्थ कार्ड देण्यात आले.याप्रसंगी बोलतांना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, सरकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधांसाठी संरक्षण असते, आरोग्य विमा प्रीमियम हप्ते भरणाऱ्या लोकांनाही ते मिळते पण गरीब, आणि दुर्बल घटकाला वैद्यकीय मदतीची गरज भासली तर पैशाअभावी त्यांना उपचार मिळू शकत नाहीत पण  आयुष्मान भारत योजनेमुळे संपूर्ण देश निरोगी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. देशभरातील सरकारी रुग्णालये या योजनेत सहभागी आहेत तशीच लवकरच बहुसंख्य खासगी रुग्णालये देखील यात समाविष्ट करण्यात येतील.


या योजनेत ११ कोटी कुटुंबाना मिळणारे हेल्थ कार्ड म्हणजे आरोग्याचा परवानाच असणार आहे असेही ते म्हणाले. आमदार किसन कथोरे व खासदार कपिल पाटील यांनी देखील या योजनेमुळे वैद्यकीय लाभ मोठ्या प्रमाणावर गरिबांना मिळून या क्षेत्रात क्रांती येईल असे सांगितले.  

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर म्हणाले की कोणत्याही शहराचा हैपी इंडेक्स हा केवळ शहरातील इमारती, सुविधा यावर मोजता येत नाही तर तेथील नागरिकांचे आरोग्य कसे आहे यावरही अवलंबून आहे. या योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल असेही ते म्हणाले.  

३.५ लाख कुटुंबाना फायदा

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ८३ हजार ८९३ तर शहरी भागातील २ लाख ६५ हजार कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालय व भिवंडी येथील इंदिरा गांधी,  कळवा येथील छत्रपती शिवाजी  महाराज तसेच उल्हासनगर येथील रुग्णालये संलग्नित करण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत 1 हजार 122 आजारांचा समावेश करण्यात आलेला आहे अशी माहिती यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलास पवार यांनी यावेळी दिली. राज्य आरोग्य हमी सोसायटी, जीवनदायी भवन, वरळी येथून या योजनेचे नियंत्रण केले जाणार आहे.
याप्रसंगी आशा स्वयंसेविका, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 
   
कोण पात्र आहेत

आयुष्मान भारत योजनेत पात्र लाभार्थी ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-जमातीचे दारिद्र रेषेखालील कुटुंब, भूमिहीन कुटुंब, दिव्यांग सदस्य असलेले कुटुंब, अतिकष्टाचे काम करणारे कुटुंब, एकाखोलीचे कच्चे घर असलेले कुटुंब, महिला कुटुंब प्रमुख असलेले, यांचा या  योजनेत सहभाग आहे. तर शहरी भागातील कचरा वेचणारे कुटुंब, भिकारी, घरकाम करणारे, रस्त्यावर विक्री करणारे, बांधकाम, रंगकाम, प्लंबर, गवंडी,वेल्डर, गटई कामगार, फेरीवाले, झाडू मारणारे/सफाई कामगार, हस्तकला कारागीर, शिंपी, वाहतूक कर्मचारी, चालक, वाहक व सायकल रिक्षा ओढणारे, दुकानात काम करणारे शिपाई, अटेंडट, हॉटेल वेटर, मेकॅनिक/वीजतंत्री, असेम्ब्ली , दुरुस्ती करणारे, धोबी आणि चौकीदार या वर्गीकरणातील कुटुंब या योजनेत पात्र आहेत.

या कुटुंबाना प्रतिवर्षी प्रति कुटुंब आरोग्यासाठी 5 लाख रुपये  विमा संरक्षण राहणार आहे. या योजनेंतर्गत त्या कुटुंबाना ठराविक आजारासाठी संपूर्ण देशभरातील कोणत्याही मान्यता प्राप्त रुग्णालयात उपचार घेता येतील. यासाठी लाभार्थी कुटुंबाना ई-कार्ड देण्यात येणार आहेत.
यासाठी जी रुग्णालये संलग्न करण्यात येतील त्या रुग्णालयातील आरोग्य मित्र हे ई-कार्ड देतील.


तूर्त राज्यात सध्या महात्मा ज्योतिबा फुले जन-आरोग्य योजना ही कार्यान्वित आहे. आयुष्यमान भारत योजनेसोबतच ही योजना चालू राहणार आहे. आयुष्यमान भारत योजनेत किरकोळ व मोठे आजार यांच्या उपचारांचा समावेश आहे. हे या योजनेचे वैशिष्ट्य होय.

केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी 'आयुष्मान भारत' प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा राज्यपाल चे. विद्यासागरराव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत राज्यस्तरीय शुभारंभ

‘सर्वांसाठी आरोग्य’ उद्दिष्ट्यपूर्तीसाठी ‘आयुष्मान भारत’ योजना महत्वपूर्ण पाऊल - राज्यपाल

मुंबई, दि. २३ : ‘सर्वांसाठी आरोग्य ह्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी आयुष्मान भारत योजना महत्वपूर्ण पाऊल आहे. ही योजना राज्यातील दुर्गम, आदिवासी भागातील लाखो बांधवांसाठी विकासाची पहाट ठरेल. महाराष्ट्रात या योजनेसोबतच महात्मा फुले जनआरोग्य योजनाही एकत्रित राबविली जाणार असल्याने राज्यातील ९० टक्के लोकसंख्येला आरोग्य विम्याचे कवच मिळणार असल्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे सांगितले.

झारखंड रांची येथून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा राष्ट्रव्यापी शुभारंभ करीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत, मुंबई शहराचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबई उपनगराचे पालकमंत्री तथा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

राज्यपाल म्हणाले,  स्वातंत्र्योत्तर काळात आरोग्य क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण संशोधन झाले. आयुर्मानात वाढ होऊन ते ३२ वरून ७० पर्यत आले. माता आणि अर्भक मृत्यूदरातही कमालीची घट झाली आहे. त्याच्याच पुढे जाऊन आयुष्मान भारत योजनाही सर्वांसाठी आरोग्य या संकल्पनेच्या पूर्तीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

या योजनेंतर्गत दीड लाख वेलनेस सेंटर संपूर्ण देशात सुरू करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात देखील नुकतेच  वेलनेस सेंटर्सचा शुभारंभ करण्यात आला आहे, हे सांगताना मला आनंद होत असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे लाभार्थ्याला कुठलाही अर्ज भरावा लागणार नाही. सहज सुलभपणे रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याची सुविधा या योजनेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात आधीपासूनच महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविली जात आहे. या सोबतच आयुष्मान भारत योजना राज्यात एकत्रितपणे राबविण्यात येणार असल्याने त्याचा फायदा ९० टक्के लोकसंख्येला होईल, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.वैद्यकीय उपचारासाठी अनेकांना घरे, शेती गहाण ठेवावं लागतं. कर्जबाजारी होण्याची वेळ त्यांच्यावर येते. वैद्यकीय उपचाराच्या खर्चामुळे दरवर्षी ४.६ टक्के लोकसंख्या ही दारिद्रयरेषेखाली जाते. अशावेळी आयुष्मान भारत योजना ही वरदान ठरणार असून दारिद्रयरेषेखाली जाण्याचे दुष्टचक्र थांबेल. या योजनेमुळे ग्रामीण भागाच्या आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक वाढून रोजगार उपलब्ध होतील, असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.


आयुष्मान भारतमुळे आरोग्य क्षेत्रात क्रांती - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आजचा दिवस देशाच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस आहे. जगातील सर्वात मोठ्या अशा शासकीय आरोग्य सुरक्षा योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतून झाला आहे. वातावरणातील बदलामुळे रोगराईचा विविध प्रकारे प्रादुर्भाव जाणवत आहे. उपचार घेण्यासाठी सामान्यांना आयुष्याची कमाई लावावी लागते, मात्र देशात प्रथमच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गरिबाला उपचार मिळाला पाहिजे असा विचार करून आयुष्मान भारत योजना सुरू केली. या योजनेमुळे आरोग्य क्षेत्रांत क्रांती होत आहे.

जगातील पहिली आरोग्य सेवा योजना अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी सुरू केली होती. त्यात १० कोटी लोकांना लाभ मिळत होता. मात्र आयुष्मान भारत योजनेमध्ये प्रधानमंत्री मोदी यांनी देशातील ५० कोटी नागरिकांचा विचार केला आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठी योजना ठरणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागात आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक होण्यास मदत मिळणार आहे. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही खासगी आरोग्य सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.


या योजनेसाठी सुरु करण्यात येणाऱ्या वेलनेस सेंटर्सच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक व प्रतिबंधात्मक आरोग्याचा विचार करण्यात आला आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला अनंत चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या.समाजातील वंचित घटकाला लाभ - आरोग्यमंत्री
 आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, आयुष्मान भारत योजना ही सर्वांपर्यंत पोहोचणारी असून समाजातील वंचित घटक डोळ्यासमोर ठेवून त्याची रचना करण्यात आली आहे. राज्यात सुरू असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून १९ लाख जणांची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याचबरोबर या योजनेला ई-गव्हर्नन्सचे पारितोषिक देखील मिळाले आहे. राज्यात या दोन्ही योजना एकत्रित राबविण्यात येणार असल्याने ९० टक्के लोकसंख्येला त्याचा लाभ मिळणार आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.झारखंड रांची येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत योजनेचा राष्ट्रव्यापी शुभारंभ केला. त्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले.


राज्यपालांच्या हस्ते राज्यातील १६ लाभार्थ्यांना ई कार्डचे वाटप करण्यात आले. आरोग्य विभागाच्या मासिक आरोग्य पत्रिकेच्या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी प्रास्ताविक केले. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सुरूवात आणि सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.