Friday, April 20, 2018

शासकीय इमारतींना वीज बचतीचा ‘स्पर्श’! ‘स्पर्श’ प्रकल्पांतर्गत राज्यातील १२६९ इमारती ऊर्जा कार्यक्षम (विशेष वृत्त)



मुंबई, दि. २० : राज्य शासनाच्या स्पर्श’ (सोलर पॉवर अँड रिनोव्हेटिव्ह सस्टेनेबल हब) प्रकल्पांतर्गत राज्यातील 1269 शासकीय इमारती ऊर्जा कार्यक्षम करण्यात आल्या असून त्यामुळे 1 एप्रिलपर्यंत सुमारे दहा लाख युनिट वीजेचा वापर कमी झाला आहे. तसेच वीज बिलापोटीच्या 92.68 लाख रुपयांची बचत झाली आहे. पहिल्या टप्प्यात शासकीय इमारतींमधील दोन लाख ट्यूबलाईट, 75 हजार पंखे व 1600 वातानुकुलित यंत्रे बदलण्यात आली आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्यातील शासकीय इमारतींमधील जुनी विद्युत उपकरणे बदलून ऊर्जा सक्षम उपकरणे बसविण्याचा स्पर्शहा उपक्रम राबविण्यात येत असून पहिल्या टप्प्यात राज्यातील सर्व शासकीय अनिवासी इमारतींमधील जुनी ट्यूबलाईट, पंखे, वातानुकुलित यंत्रे बदलून ऊर्जा बचत करणारी नवीन उपकरणे बसविण्यात येत आहेत. आतापर्यंत 1269 शासकीय इमारतींमधील जुनी ट्यूबलाईट, पंखे, वातानुकुलित यंत्रे बदलून नवीन ऊर्जा कार्यक्षम केल्यामुळे सुमारे 9.95 लाख युनिट्स वीजेची बचत झाली असून वीज बिलातही सुमारे 92.68 लाख रुपयांची बचत झाली आहे. स्पर्श उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात सर्व शासकीय इमारतींच्या छतांवर व परिसरातील मोकळ्या जागेत सौर ऊर्जा निर्मितीची सयंत्रे बसविण्यात येणार असून त्यामार्फत राज्य शासनाच्या इमारतींमध्ये सौर विद्युत निर्मिती करण्यात येणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेमार्फत राज्य शासनाच्या सर्व इमारतींमधील विद्युत संच मांडणी  व विद्युत उपकरणे यांची देखभाल दुरुस्ती करण्यात येते. इमारतींमधील या उपकरणांच्या वीज शुल्क संबंधित वापरकर्त्या विभागामार्फत करण्यात येते. परंतु इमारतींमधील अनेक उपकरणे ही जुनी असल्याने मोठ्या प्रमाणात वीज खर्च होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने ही उपकरणे बदलण्यासाठी स्पर्शहा उपक्रम हाती घेतला. यासाठी केंद्र शासनच्या ईईएसएलया कंपनीबरोबर सहकार्य करण्यात आले आहे. यासाठी राज्य शासन व केंद्र शासनाच्या ईईएसएलकंपनी यांच्यात 24 ऑक्टोबर 2017 रोजी करार करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी सुमारे 307 कोटी रु. एवढी भांडवली गुंतवणूक करण्यात येणार आहे. वीज बिलाच्या बचतीमधून सुमारे 70 टक्के   भाग हा ईईएसएल कंपनीस दर त्रैमासिकास टप्प्याटप्प्याने परत करण्यात येणार आहेत. ही परतफेड ही 20 टप्प्यांमध्ये म्हणजेच पुढील पाच वर्षात करण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षात ही कंपनी बदललेल्या वीज उपकरणांची देखभाल व दुरुस्तीही करणार असल्यामुळे राज्य शासनाच्या विद्युत उपकरणांच्या देखभाल व दुरुस्तीवर होणारा खर्चही वाचणार आहे.

स्पर्शप्रकल्प
स्पर्शप्रकल्प एकूण दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात संपूर्ण राज्यातील शासनाच्या अनिवासी इमारतीमधील सुमारे 5.15 लाख ट्यूब लाईट व दिवे, सुमारे 2.50 लाख पंखे, सुमारे 25 हजार वातानुकुलित यंत्रे व इमारतीच्या परिसरातील पथदिवे इत्यादी जुनी उपकरणे बदलून नवीन ऊर्जा कार्यक्षम उपकरणे बसविण्यात येणार आहेत. आतापर्यंत त्यातील राज्य शासनाच्या सुमारे 1269 इमारतीमधील कामे पूर्ण झाली असून त्यामधील सुमारे 2.16 लाख ट्यूब लाईट व दिवे, 74 हजार 594 पंखे,  1670 वातानुकूलित यंत्रे बदलण्यात आली आहेत.

दुसऱ्या टप्प्यात सौर ऊर्जेवर भर
स्पर्शया उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्य शासनाच्या सर्व इमारतींच्या छतांवर व परिसरातील मोकळ्या जागेत सौर ऊर्जा निर्मितीची सयंत्रे बसविण्यात येणार आहेत. यातून तयार झालेल्या सौर ऊर्जेचा वापर शासकीय इमारतींमध्ये वापरण्यात येणार आहे. तसेच अतिरिक्त वीज ही महावितरण मार्फत वितरित करण्यात येणार आहे. यासाठी शासकीय इमारतींमधील वीज मीटर हे “Net Metering” या पध्दतीचे बसविण्यात येणार आहेत. यामुळे वीज देयकांमध्ये मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. यासाठी प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले असून त्यानुसार सुमारे 450 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

वर्षाकाठी १२० दशलक्ष युनिटची वीज बचत होणार - चंद्रकांत पाटील
सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले, राज्यातील शासकीय इमारतींमधील उपकरणामुळे मोठ्या प्रमाणात वीज खर्च होते व वीज देयकामध्येही मोठा खर्च होतो. यामुळे स्पर्श हा आगळावेगळा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. ऊर्जा कार्यक्षम उपकरणे बसविल्यामुळे राज्य शासनाच्या इमारतीमधील वीजेच्या वापरामध्ये बचत होणार असून वा‍र्षिक सुमारे 120 दशलक्ष युनिट्स वीजेची बचत होणार असून वीज देयकामध्येही वा‍‍र्षिक सुमारे 114 कोटी रुपये वाचणार आहेत. सर्व शासकीय इमारतींमधील जुनी उपकरणे बदलून नवीन ऊर्जा कार्यक्षम उपकरणे बसविल्यामुळे ऊर्जेतील बचतीबरोबरच खर्चातही मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. पुढील टप्प्यात सौर ऊर्जेवर भर देण्यात येणार असल्यामुळेही ऊर्जा संवर्धनासाठी मोठा हातभार लागणार आहे.

पुणेनागपूरमुंबईठाणेकोल्हापूरऔरंगाबाद जिल्ह्यातील इमारतींचा समावेश
स्पर्शप्रकल्पांतर्गत नागपूरमधील राजभवन, विधानभवन, रवि भवन, आमदार निवास, हैद्राबाद हाऊस, पुण्यातील राजभवन, सेंट्रल बिल्डिंग, जिल्हा रुग्णालय, सोलापूरमधील शासकीय सर्वोपचार रुग्णालय, मुलुंड येथील विमा रुग्णालय, मुंबईतील बांधकाम भवन, जीटी हॉस्पिटल, ठाणे जिल्हाधिकारी कार्यलय, कोल्हापूरमधील सीपीआर रुग्णालय, मध्यवर्ती प्रशासकीय भवन आणि औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाचे खंडपीठ या इमारतीमध्य ऊर्जा कार्यक्षम पंखे, दिवे, वातानुकुलित यंत्रे बसविण्यात आली आहेत. यामुळे या इमारतींमधील वीज बचत तसेच वीज बिल देयकामध्ये बचत होण्यास सुरुवात झाली आहे.

००००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/20.4.2018